डॉ. कुमार गायकवाड व डॉ.श्वेता सिंग यांच्या व्यसनमुक्ती कार्याबद्दल व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य याच्या तर्फे गौरव पुरस्काराने सन्मान
आनंदी परिवार फाउंडेशन संचलित दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्रामध्ये व्यसनी व्यक्तींसाठी निसर्ग उपचारांद्वारे व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवला जातो. आतापर्यंत हजारो लोकांना या केंद्राद्वारे व्यसनमुक्त केले गेले आहे. याची दखल घेत व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे केंद्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक जाधव, प्रवक्ते विलास बाबा जवळ व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थि त होते. हा कार्यक्रम राष्ट्रबंधू राजीव दिक्षित गुरुकुल, पिंपरद,तालुका- फलटण येथे आयोजित करण्यात आला.
व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणे म्हणजे एकाच वेळी शासन, लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणा यांना सोबत घेऊन कृती कार्यक्रम राबवावा लागेल असे मत उपस्थितांनी मांडले.
तसेच लोकांनी फक्त दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनाबद्दल न बोलता ,थोड्या थोड्या गोष्टीसाठी औषधे खाण्याची सवय असणे हेसुद्धा एक व्यसन आहे असे मत डॉ.श्वेता सिंग यांनी मांडले . विद्यार्थी दशेपासूनाच सर्वांना निसर्गोपचार शिकवले तर समाज व्याधिमुक्त व औषध मुक्त जीवन जगू शकेल असाही सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला. व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपली संगत योग्य ठेवा व आपल्या पालकांसोबत सतत चांगला संवाद ठेवा असा सल्ला डॉ कुमार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आधुनिक शिक्षणासोबत जर अध्यात्माची जोड दिली तर कोणताच विद्यार्थी व्यसनाधीन होणार नाही असे मत डॉ.कुमार गायकवाड यांनी मांडले . या कार्यक्रमात ह.भ. प. बंडातात्या कराडकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला व व्यसनमुक्त युवक संघाचे काम सर्वत्र कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
