“गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३५ जणांनी घेतली ‘दारूमुक्तीची शपथ’ – आनंदी परिवार फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम”
माढा: गुढी पाडव्याच्या शुभदिनी समाजासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत आनंदी परिवार फाउंडेशन यांच्या वतीने व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील रिधोरे येथील दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्रात पार पडलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये तब्बल ३५ रुग्णांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा लाभ घेतला. विशेष म्हणजे सर्व रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांनी आयुष्यात पुन्हा दारू न पिण्याची दृढ शपथ घेतली. या बदलामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार गायकवाड यांनी सांगितले की, “जर एखादी व्यक्ती स्वतःहून दारू सोडायला तयार नसेल, तरीही विशिष्ट औषधोपचारांच्या मदतीने त्याला व्यसनमुक्त करता येते. त्यामुळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी पुढे येऊन संपर्क साधावा.”आनंदी परिवार फाउंडेशनद्वारे स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र चालवले जाते, आणि आतापर्यंत हजारो लोकांना नवजीवन देण्यात यश आले आहे.
