
श्रीमंत होण्यासाठी आपल्या काही ठाम, नकारात्मक किंवा कालबाह्य समजूती बदलण्याची प्रचंड गरज आहे. या समजूती आपल्या मनात घरकुल करून राहतात, कारण लहानपणापासून आपल्या कामावर पुढील काही वाक्यांचा मारा होत असतो:
- श्रीमंत होणे हे काय सोपं आहे ? हे काय खायचं काम आहे ?
- हा आपल्यासारख्यांचा मार्ग नाही.
- श्रीमंत होण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा काय झाडाला लागतो ?
- पैसा फक्त पैसेवाल्यांकडेच जातो. लक्ष्मी लक्ष्मीकडेच जाते.
- श्रीमंत होण्यासाठी गर्भश्रीमंत होणे गरजेचे असते.
- आपला जन्म सर्वसाधारण कुटुंबात झालेला आहे.
- पैशाची हाव अगदी वाईट असते.
- पैशामुळे माणूस बिघडतो. सर्व वाईट गोष्टींचे मूळ पैसा आहे.
- श्रीमंत व्यक्ती वाईट कृत्ये करतात. लांडी-लबाडी करुन पैसा कमावतात. ती चांगली माणसे नसतात.
- स्वतःला अति शहाणे समजतात.
- श्रीमंत व्यक्ती गर्विष्ठ असतात. ते फुकट भाव खातात.
- कोणीही लखपती, करोडपती होऊ शकत नाही, त्यासाठी दैवी देणगी लागते.
- सुख-समाधान काय श्रीमंतीमुळे मिळते ? श्रीमंत व्यक्तींना फक्त पैसाच हवा असतो. त्यांना माणुसकी नसते.
- तो पैशाच्या मागे लागला आणि आयुष्यातून उठला. पैशाच्या मागे लागल्यामुळे तो आंधळाच झाला आहे.
लहानपणापासून अशा प्रकारची वाक्ये कानावर पडल्यामुळे श्रीमंतीविषयी आपल्या मनात घृणा निर्माण होते. ही घृणा, हा तिरस्कार, हा द्वेष मनातून काढून टाका आणि म्हणत राहा, ‘मी श्रीमंत होणारच!’




