
१. ग्राहकाच्या नजरेत बघा आणि त्याला वस्तू विकत घेण्यातला जास्तीत जास्त फायदा समजाऊन सांगा. हे सांगत असताना नकळत त्याच्या स्वप्नांत दिसलेल्या वस्तूंना वा उपयुक्ततेला तुम्हाला स्पर्श करता आला पाहिजे,
२. ग्राहकाशी संवाद साधताना आपल्या विषयावर ठाम रहा. मुख्य म्हणजे आपला स्तर- आपली प्रतिष्ठा सोडू नका. अखेरीस किंमतीबाबत तडजोड करण्याला काही मर्यादा असतात. एका विशिष्ट मर्यादेच्या खाली येऊन वस्तू विकू नका.
३. आपल्या ग्राहकाशी पूर्ण प्रामाणिक रहा. ज्या उत्पादनाबद्दल तुम्हालाच खात्री नसेल तर ती वस्तू विकण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्ही विश्वासार्हता गमावून बसाल. अखेरीस फसवणूक झाल्याच्या वेदना मोठ्या असतात विसरू नका.
४. आपल्या ग्राहकाबरोबर जरी तुम्ही विक्रीच्या निमित्ताने प्रथमच भेटणार असलात तरी त्याच्याशी एक माणूसकीचे एक नाते विकसित करता येणे शक्यआहे. गरजेतून दंडवत, असा प्रकार ग्राहकाच्या बाबतीत करू नका ।! निर्हेतूक संवादातून अनेकदा फायदाच होत असतो.
५. तुमचे ग्राहक तुमच्यावर कळत नकळत विसंबून राहतात आणि तुमच्याकडे काही गोष्टींची मागणी , सवलत मागतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांचा सन्मान राखा, घशातून बोलण्यापेक्षा हृदयातून बोला , जे आहे त्याला सामोरे जा आणि जे घडावे असे वाटते, त्याप्रमाणे पण योग्य संवाद साधा. हे ही वाचा- अशा पॉन्झी स्कीम्स समजून घेतल्या तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही.
६. तुमच्या ग्राहकाची मानसिकता, गरज वा आर्थिक स्थिती नीट समजून घ्या. याचे योग्य आकलन झाल्याशिवाय तुम्ही तुमची वस्तू त्याला विकू शकत नाही हे लक्षात घ्या. योग्य श्रवणाची कला विकसित करा.
७. संवाद, परस्परांविषयी विश्वास, आदान-प्रदान, समज-गैरसमज, समजूत. तसेच प्रतिमा, आशा-निराशा तसेच विविध स्वभाव वा तन्हा या सर्वातून प्रत्येक सेल्समनला-विक्रेत्याला जावेच लागते. अखेरीस आपल्या व्यवसायाला आणि आपल्या जीवनाला खरी प्रतिष्ठा मिळवून देणे, हे केवळ आपल्याच हातात आहे.
८. दिलेला शब्द पाळा आणि योग्य तो प्रतिसाद द्या. एखादी गोष्ट वा सवलत देता येणे शक्य नसल्यास, तसे स्पष्ट करा पण कुठल्याही परिस्थितीत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. संवेदनशीलता, दाक्षिण्यशीलता, सभ्यता आणि सद्भाव या गुणांचा बिनशर्त स्वीकार करीतच व्यवहार करा. अखेरीस व्यवहाराचे व माणूसकीचे पावित्र्य जपणे हे आपले नैतिक कर्तव्यच आहे.
९. अनेक विक्रेते हे, तुम्ही आधी माल तर निवडा आणि उरलेले आमच्यावर सोपवा, अशा प्रकारची उत्तरे देतात. खोटी, लाघवी व फसवी आश्वासने देतात. पण अखरीस ग्राहकाचे हात रिकामेच राहतात. तुम्हा मात्र तसे करू नका शब्दांचे महत्व ओळखा. कारण अनेकदा तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला गोत्यात आणू शकतो. इतकेच नव्हे तर तो तुमच्या मानसिक ताणतणावाला निमंत्रण देऊ शकतो.
१०. आपल्या वस्तूची विक्री घेतल्यानंतरही ग्राहकाशी सतत संवाद साधत रहा
व्यवहार झाला, संवाद संपला असे नसते. ग्राहकाच्या अनेक शंका-कुशंका असतात. ते नाना तऱ्हेने प्रश्न विचारतात. कदाचित तुम्हाला ते प्राथमिक वाटले तरी त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असतात. कारण त्यांनी त्यासाठी योग्य ती किंमत मोजलेली आहे, याचे विस्मरण होऊ देऊ नका ! विक्री झाल्यानंतर फोनवर आपण विकलेल्या वस्तूबद्दलचा अभिप्राय विचारायला आणि ग्राहकाला शुभेच्छा द्यायला विसरू नका !



